मातीच्या घरातून उठलेला हा दिवा, ज्ञानाची ज्योत घेऊन आयुष्यभर जळला. दुर्गम वाटांवर पाऊल ठेवत, विद्यार्थ्यांच्या भविष्यात सोनं पेरत गेला. रखरखीत उन्हातही हसून शिकवणारा, पावसात ओढे ओलांडून पोचणारा, गरीबीचा चटका अनुभवलेला, पण मनाने सोन्याहूनही शुद्ध असणारा… आज अचानक शांत झाला हा दिवा, पण त्याच्या उजेडाची उब शेकडो मनांमध्ये कायम तेजाळत राहील… तुमच्या हसऱ्या चेहऱ्याने अनेक आयुष्यांची दिशा बदलली, तुमच्या एका प्रोत्साहनाने शेगाव ते शाहुवाडीच्या वाड्या उजळल्या. तुम्ही फक्त शिक्षक नव्हता सर… तुम्ही चालती-बोलती प्रेरणा होतात, गरीबीची राख कुरवाळत मोठी स्वप्नं पेटवत होता. आज तुमची खुर्ची रिकामी झाली असली, तरी तुमची शिकवण रोज सकाळी शाळेत घंटेसोबत जागी होते. तुम्ही नाही… पण तुमचं "सरपण" कायम आहे. धनवडे सर… आपण जिथे आहात, तिथेही ज्ञानाचीच फुले उमलवत असाल…